Friday, July 13, 2007
आशेचा किरण
नको मना निराश होऊ, आशेची कास धर
संध्याछायेचा खेळ नित्य चाले जीवनात
तरीही रोज होते प्रसन्न प्रभात
रात्रीच्या अंधारात सुख शांत झोपते
दुःख असता मात्र झोप चाळवते
रविकिरणांच्या चाहुलीने सकाळ तेजाळते
सर्व प्राणीमात्रांना ती कामाला लावते
दुःखमय जीवनी आशेचा एक किरण
उजळून टाकतो मनाचा कण अन् कण
-सौ. प्रतिमा उदय मनोहर
Sunday, July 1, 2007
मानवी जीवन आणि गणित
"ए आई, लवकर इकडे ये. हे गणित मला समजावून सांग ना." छोटी मीनु मला म्हणाली आणि माझं मन विचार करू लागलं -प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी गणिताचं किती दृढ नातं असतं! पुस्तकी गणित प्रयत्नांनी सुटू शकतं. पण त्या परमात्म्याने मानवाचं गणिताशी जन्मत: जे नातं दृढ केलं असतं ते मरणानेच सुटतं. जीवन-मरणाच्या चक्राप्रमाणे गणिताचं हे चक्र अव्याहत चालू असतं. एक ते शून्य आकडे भौतिक गणितं सोडवतात. मानवी जीवनाचा पाठपुरावाही हे अंकच करीत असतात.
ब्रह्म एक असतं. त्याला आपण ईशतत्व किंवा गणेशतत्व म्हणतो. त्यापासून प्रकृती व पुरुष या दोन रूपांची निर्मिती होते. या दोहोंच्या एकरूपतेतून जीवाची निर्मिती होते. त्यात ईशतत्वाचा अंश असतो, म्हणजेच जीव आणि शिव एकरूपतेने वास करतात. या जीवाच्या अवस्था तीन - उत्पत्ती, स्थिती व लय. त्यांच्या अधिष्ठात्री दैवतं तीन - ब्रह्मा, विष्णु व महेश. या जीवनाचे पुरुषार्थ चार - धर्म, अर्थ, काम व मोक्ष; व त्यांचे सार सांगणारे वेदही चार. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या पाच तत्वांपासून या जीवाची निर्मिती झालेली असते. त्यावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सहा विकारांचा पगडा असतो. हे मोक्षमार्गाच्या आड येत असल्यामुळे यांनाच षड्'रिपु' म्हणतात. मानवाचे शारीरिक आरोग्य सात चक्रांच्या समतोलाने समृद्ध होते - १. मूलाधारचक्र, २. स्वाधिष्ठानचक्र, ३. मणिपुरचक्र, ४. अनाहतचक्र, ५. विशुद्धचक्र, ६. आज्ञाचक्र ७. सहस्राधारचक्र. मानवाच्या ज्ञानतत्वांशी आठ या अकड्याचा संबध आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध आणि मन, बुद्धी व अहंकार यांच्या सहाय्यानेच मानवाला सभोवतालची जाणीव होते. हा मानवी देह नऊ द्वारांनी युक्त आहे. दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, एक मुख, ही चेहर्यावरील सात द्वारे व दोन निकासाची द्वारे. इतकी द्वारे या देहात असूनही प्राण या देहात राहतो ही ईश्वराची किमया. जीवनाच्या अंती मात्र हा प्राण देह सोडतो व शून्यात विलीन होतो, ज्याला कुणी पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. पुन्हा पंचमहाभूतांच्या सान्निध्यातून हा प्राण नवा देह धारण करतो व जीवनाचे हे 'अंकगणित' अव्याहत चालू राहते.
मला अशी माझ्याच विचारात गुंग झालेली पाहून मीनू म्हणाली, "अग आई, तुझं लक्ष्य कुठे आहे? गणित शिकवतेस ना?" मी भानावर आले; व तिला पुस्तकी गणितं सोडवण्यात मदत केली.
-सौ. प्रतिमा उदय मनोहर
माय मराठी
धन्य धन्य ही माय मराठी थोर तिची कीर्ती
ज्ञानेश्वरीतुन गीतार्थ गूढ ज्ञानेश्वर वदती
मायबोलीतुन निरुपण करुनी सकलां उद्धरती
तुकयाने ती लिहिली गाथा विठ्ठलचरणी ठेउनि माथा
नामयाच्या अभंगातून भाषा रसाळ ही झाली
या भाषेचे रूप आगळे शब्दांचे भावार्थ निराळे
काव्यरूप हे हिला लाभता मने झंकारती
-सौ. प्रतिमा उदय मनोहर