Wednesday, January 16, 2008

निसर्ग आणि धरा

त्याचं अस्तित्वंच वेगळं. तो अत्यंत अनाकलनीय, सुंदर, मनस्वी. त्याचा वेग, आवेग - सर्वच उस्फूर्त आणि कोसळल्यासारखं. असा हा किमयागार आहे तरी कोण?..... सतत रूपं बदलणारा. क्षणोक्षणी आश्चर्यचकित करणारा. कधी ढगांचे ढोल वाजवीत तर कधी वीजांचा लखलखाट करीत कोसळणार्‍या पावसातून आवेशाने व्यक्त्त होणारा. कधी तप्त झळांनी सर्व प्राणीमात्रांना त्रस्त करणारा.

त्याची सर्वच रूपं कशी रसरसती! त्याचं शांत रूप खूपच लोभस, कोमल, मनाला आल्हाददायक वाटणारं, सौंदर्याने नटलेलं. म्हणून तर मानव नेहमी त्याच्या सानिध्यात जाण्यास उत्सुक असतो. त्याचं नटणं तरी किती विविधरंगी! फुलांचे, पानांचे किती वेगवेगळे आकार, रंग! एकाचं रूप दुसर्‍याहून निराळं. त्याचं शांत रूप जितकं सुखावणारं तितकंच त्याचं रौद्र रूप मनाला भयभीत करणारं. सागर, नद्या अतीवृष्टीने आपली मर्यादा सोडतात आणि पुराने गावंच्या गावं नष्ट होतात. तर कुठे अती उष्णतेने वणवा पसरतो.

अनिर्बंध असतो तो. त्याला मनस्वी स्वभावामुळे विविधप्रकारे व्यक्त होणं जमतं. सुंदर तर तो आहेच; तसाच गूढही आहे. आणि तू, त्याची सखी - त्याच्या मनस्वीपणाला पूर्ण सामर्थ्याने सहन करणारी. किती गं सहनशील तू? त्याचे वेग, आवेग सर्व किती लीलया झेलतेस तू! त्याने पर्जन्याच्या धारांतून बरसावं आणि तू शांतपणे अंतरीच्या गूढ गर्भी शक्य तेवढं जल शोषून साठवून ठेवावं. अगदीच अनावर झालं तरंच नकार देतेस. त्याने तप्त झळांनी भाजुन काढलं तरी तू सहन करतेस. तुझी सहनशीलतेची मर्यादा संपली तर मात्र तू ज्वालामुखीच्या रूपाने आपली असह्य उष्णता बाहेर टाकतेस. आणि परत त्याच्या अनावरतेला सामावून घेण्यास सिद्ध व सज्ज होतेस. त्याने केलेल्या जलसिंचनाने तृप्त होऊन हिरवाईचा शेला पांघरून परत त्यच्या स्वागतास प्रसन्नपणे सामोरी जातेस.

तुझ्याशिवाय त्याचं फुलणं अपुरं आहे आणि त्याच्या उत्कटतेशिवय तूही अपूर्णच आहेस की गं. जन्मोजन्मीचं अतूट नातं आहे तुमचं दोघांचं! मानवाला अन्न, वस्त्र, निवारा देतेस म्हणून तुला अवनि म्हणतात. सर्व सजीवांना आधार देते म्हणुन तुला धरा म्हणतात. सर्वांवर मातेसारखे प्रेम करतेस म्हणून तू वंदनीय आहेस, पूजनीय आहेस. हे धरणीमाते, हे निसर्गराजा, तुम्हाला शतश: प्रणाम!