Sunday, September 30, 2007

चार ओळी

मुक्त मी स्वच्छंद मी
बेभान मी स्वप्नील मी
या अशा उन्मुक्ततेला
उत्स्फूर्त तुझी साथ ही


फुले पारिजात पानोपानी
शुभ्र सडा पडे अंगणी
जणू स्वागता उषेच्या
अंथरला शुभ्र गालिचा


पहाट गुलाबी थंडीची
वाट धुक्यात हरवली
होता भानूचा उदय
मिळे सृष्टीलाच ऊब


मळभ येतसे अंबरी
आकाश डहुळे अंतरी
वीज कडकडाट करी
पडती पावसाच्या सरी

Monday, September 10, 2007

अर्चना

गजानना श्री गजवदना
नित करते मी तव अर्चना

सर्वांगी चर्चिला शेंदूर
माथी वाहियले दूर्वांकुर
जोडूनिया उभय कर
वंदन तुजला करीते मी

तुज आवडती शमी मंदार
जास्वंदीचे पुष्प मनोहर
लाडू मोदक आणिक खीर
नैवेद्य तूज दाविते मी

करी प्रार्थना तव चरणी
राही मन तव नामस्मरणी
प्रेमभावे अंतःकरणी
तव पदी लीन होते मी

होवो मज तव दर्शन
आतुरले हे माझे मन
गळून पडो माझे मीपण
हीच आस मनी धरिते मी

Sunday, September 2, 2007

मन आनंदाने नाचे

लाभे सान्निध्य निसर्गाचे
मन आनंदाने नाचे

वाट डोंगर दर्‍यांची
सर येई पावसाची
धुके पसरले दाट
दिसेनाशी झाली वाट
रम्य या निसर्गात मन आनंदाने नाचे

पाणी ठेविले धरणी बंधनी
तरी वाहे ते खळाळूनी
चिंब भिजती ग सारे
होती बेभान पाण्याने
विसरून बंधन वयाचे मन आनंदाने नाचे

क्षण लाभे आनंदाचा
पावसात भिजण्याचा
उमलती फुले विविधरंगी
सृष्टी हरित होई अंगी
पाहूनी ईश्वरी चमत्कार मन आनंदाने नाचे


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

स्पर्श

स्पर्श सांगतो जीवाला
अर्थ खर्‍या भावनेचा
स्पर्शातून आईच्या
झरे झरा वात्सल्याचा

स्पर्श गुरू-आशिषाचा
देई आधार मनाला
स्पर्श घडवी दर्शन
अंतर्भावांचे मनाला

स्पर्श मूक सुहृदांचा
शांतवितसे मनाला
जे न सांगू शके वाणी
स्पर्श सांगे ते तत्क्षणी-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Saturday, September 1, 2007

प्रभात

झुंजुमुंजु झाल्या दिशा झाली पहाट पहाट
पक्षी करिती किलबिलाट धुक्यात हरवली वाट
त्या धूसर वाटेवरुनी चालत जाता दूरवर
दिसला चक्षुंना अपूर्व निसर्गाचा चमत्कार

वाट होती वळणांची डोंगरावर जाणारी
त्या पहाटवेळेला होती शांत सृष्टी सारी
जाता डोंगरमध्यावर दृष्य देखिले विलोभनीय
प्राचीला डोंगराआडून होत होता सूर्योदय

दूरवरी देवळात होत होता घंटानाद
पक्षी आनंदाने करिती मधुर नाद
होता हवेमध्ये तेव्हा सुखद गारवा खरा
शुद्ध वातावरणाचा आनंद मिळे न्यारा-सौ. प्रतिमा उदय मनोहर