Wednesday, April 18, 2007

कवन

जीवनाचे तरु | लोटले संसारी|
जावे पैलतीरी| ध्येय एक ||१||

या भवसागरी| षडरिपूंचे डोह|
गटांगळे जीव| त्यांत नित्य ||२||

चिंतेची वादळे| येती प्रवासात|
भरकटे जीव| वादळांत ||३||

मायेचा भोवरा| मोहवी मनांस|
घालितसे पाश| जीवां नित्य ||४||

सुखदुःखरूपी| हा भवसागर|
तरण्यास जपा| रामनाम ||५||

कवनाची स्फूर्ती| दिली रामराये|
मी तर जुळारी| जीव एक ||६||


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

कृष्णलीला

रुमझुम वाजती वाळे बालमुकुंदाचे
नंद यशोदा करिती कौतुक कृष्णकन्हैयाचे

पुत्र आठवा देवकीचा हा वाढे नंदाघरी
कंसासि होई श्रुत वार्ता - असे जीवित त्याचा अरी!

पुतनेसी त्या कंस पाठवी हरण्या हरीचे प्राण
शेषुनी पान्हा पुतनेचा हरी हरण करी तिचा प्राण

गोप-गोपिकांसवे खेळतो कान्हा मथुरेत
त्यांच्या संगे गुरे राखण्या जाई वनी आनंदात

गोपाळांचा जमवुनि मेळा करी गोरस चोरी
रानी वनी हिंडता वाजवी गोड स्वरे बासरी

अशा अनंत लीला केल्या बालपणी कृष्णाने
श्रवण करिता प्रसन्न होई मन अती आनंदाने


-सौ. प्रतिमा उदय मनोहर