Thursday, June 21, 2007

सागर - सरिता

तू अथांग सागर मी खळाळती सरिता
नित प्रवाहित होते तुझ्या मीलनाकरिता

तू सदैव घनगंभीर मी प्रवाहित नीर
तुझ्या भेटीसाठी मी झाले अधीर

तुझ्या मीलनाचा मार्ग असे अडथळ्यांचा
दर्‍या-डोंगरांचा अन् आडवळणांचा

ओलांडूनी सर्व संकट मी धावते रात्रंदिस
तू दिसता समोरी धन्य वाटे रे मनांस

चाले सतत सोहळा आपुल्या मीलनाचा
एकच मम मनी ध्यास तुला भेटण्याचा


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

सौंदर्य

उगवता सूर्य, कोवळं ऊन
प्राचीचे रंग उधळले सुंदर

पाण्यातील तरंग, कारंजाचे तुषार
झुळझुळ झरा वाहतो सुंदर

बाळाचे हसणे, कळी उमलणे
नवी पालवी दिसते सुंदर

घंटेचा नाद, सनईचे सूर
गाण्याची तान गुणगुणली सुंदर

चमचमत्या चांदण्या, चंद्राची शीतलता
पहाट वारा वाहे सुंदर


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

सख्या रवीच्या

प्रातःकाली रविकर येई धरुनी उषेचा हात
उषा लाजली त्या स्पर्शाने हसे हळूच गालात
पक्षी गाती मधुर स्वरांनी रम्य पहाट गीत
लाल केशरी सहस्र किरणे नक्षी काढिती गगनात

झुळझुळ वाहे शीतल वारा होई पुलकित धरती
हळुहळु दिन हा पुढे सरकतो प्रकाश पसरे आसमंती
रवि तेजाने तळपू लागे सोडी हात उषेचा
अशा प्रखर तेजाला लाभे संग माध्यान्हीचा

तेजस्वी सूर्याची किरणे होता थोडी शांत
दिन ढळला आणि म्हणाला झाली आता सांज
संध्या येई स्वागता रविच्या माध्यान्ह सोडे हात
एकच रविकर प्रिय होई तिघींना काय ईश्वरी मात


-सौ. प्रतिमा उदय मनोहर