Sunday, November 10, 2013

इंद्रधनुष्य

तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे
नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा
पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे
हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत करी सर्वांचे
निळ्या निरभ्र आकाशी धनु दिसे मनोरम इंद्राचे
पारवा हा रंग अनोखा शोभे इंद्र धनुष्यात
जांभळ्याची गडद किनार उठुन दिसते सर्वात
सप्त रंगी या धनुने शोभा वाढविली या गगनात
पाहुनी हरखे मयुर मनी नर्तन करी आनंदात

Tuesday, September 17, 2013

का गमलास दमुनी?

का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तूच प्रामाणिक असा साक्षीदार. माणसाच्या प्रगतीचा, बुद्धीचा कुठलाही आविष्कार तुझ्याशिवाय अपूर्णच! रामायण महाभारतासारखी महाकाव्ये असोत की गीता, ज्ञानेश्वरीसारखे धर्मग्रंथ. अगदी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात, गावात वाचले जाणारे साहित्य असो, वर्तमानपत्र असो, किंवा कुठलाही दस्तावेज असो, तुझ्याशिवाय सारे अशक्याच!

छापखाने खूप नंतर आले. तुझा उपयोग मात्र मानवाने अगदी आदिकालापासून केला. भूर्जपत्रापासून ते आजच्या सुंदर गुळगुळीत कागदापर्यंतचा तुझा प्रवास यात कितीतरी जीवनांचे, घटनांचे, आलेख तू सामावून घेतलेस. माणसाने त्याचा मानसन्मान, प्रतिष्ठा, मनातला राग, लोभ, गीत-काव्यासारख्या तरल भावना, इ. सर्व सर्व तुझ्या रूपात जतन करून ठेवले.

पण आज हाच मानव तुझा उपयोग लिहिण्याकरता कमी, व इतर कामांसाठी जास्त करायला लागलाय. चूल पेटवायचीये, कचरा जाळायचाय – पेटवा कागद, करा जाळ! माणूस आपल्या सर्वांगीण स्वच्छतेकरता तुझा वापर यथेच्छ करत आला आहे. तरीही बोलताना अगदी तुच्छतेने म्हणतो - किती घाण झाली आहे! उचला कागदाने आणि फेका बाहेर.

तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! लहानपणी शाळेत हस्तकलेचा तास असायचा त्यात कातरकामासाठी, फुले, हार, विविध वस्तू बनवण्यासाठी तुझा उपयोग करायला शिकवायचे! रंगीत, घोटीव, अशी तुझी वेगवेगळी रूपं पहायला मिळायची. तुझ्या या रूपांत तुला माणसाच्या निरागस बाल्याचा स्पर्श झाला आणि त्या हळुवार भावनेने भारावून जाऊन तू आयुष्यभर त्याचे मानसन्मान, त्याची सुखदुःखे, वैचारिक तगमग – सारं काही जपून ठेवलंस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विचार तू सर्वांना सारखेपणाने वागणूक देऊन स्वतःच्या शरीरावर सामावलेस व अमर केलेस.

छापण्याच्या तांत्रिक प्रगतीबरोबर तुझ्या रूपात अनेक बदल घडत गेले. आता तर किराणामाल, मिठाई, भाजीपाला, सर्वांसाठीच तुझ्या पिशव्यांचा वापर होतो. मध्यंतरी तुला शह देण्यासाठी पॉलिथिन हे टिकाऊ माध्यम आले. पण तुझी जागा मात्र त्याच्याही वरच राहिली. कारण तुला जाळले तरच मरण! अन्यथा, पुनर्वापराच्या तंत्रामुळे तुझा वापर अबाधित राहिला.

तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राची मदत घेतली जाते. पण तू असा गमू नकोस. दमला असशील, तरी रागावू नको रे!

Sunday, May 12, 2013

आई


आई म्हणजे आभाळ मायेचे, निस्वार्थ प्रेमाचे.

आज आईची खूप आठवण येते आहे. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत आईचे प्रेमळ छत्र लाभले हे खरेच माझे भाग्य. आईला जाऊन दोन महिने झालेत, पण अजूनही तिचे नसणे मन मान्यच करत नाही. ती होती तेव्हा अधुनमधुन आमचे फोनवर बोलणे व्हायचे. पण आता.... नुसत्या आठवणी.

बालपणीची आठवण म्हणजे आम्ही पुण्याला होतो, आम्ही सर्व भावंडे लहान होतो आणि घरी आजी होती. आई तेव्हा रेस्कॉन कंपनीत नोकरी करायची. सकाळी आपले काम भरभर आटपून पावणेआठवाजता घराबाहेर पडायची आणि साडेचार वाजता घरी यायची. तिची ती धावपळ, लगबग एवढीच तेव्हाची आठवण.

मध्ये बरीच वर्षे गेली. आम्ही आप्पांच्या (वडील) बदलीमुळे इंदौरला आलो. सुरुवातीची दोन वर्षे आई घरी होती. नंतर तिला एम्.पी..बी.मध्ये नोकरी लागली व परत तिची धावपळ सुरू झाली. कौतुकाची गोष्ट अशी, की वयाच्या चाळिशीत ती अप्पांकडून सायकल शिकली व ऑफ़िसला सायकलने जायला लागली.

आईला वाचनाची खूप आवड होती. ती दररोज रात्री आजीला शिवलीलामृत वाचून दाखवायची. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक तिला आवडलं की आजीला आवर्जून वाचून दाखवायची. दिवसभर नोकरी, सकाळ-संध्याकाळ घरकाम, यात व्यस्त असूनही आई प्रसन्न आणि मदत करायला सदैव तत्पर होती.

हातात कधी जपमाळ घेतली नाही, पण आईच्या तोंडात नेहमी रामनाम असे. कोणीही भेटलं की त्याला "श्रीराम जयराम" म्हणायची. हिंदीप्रदेशातच जन्मापासून राहिली, तरी सर्वांशी मराठीतच बोलायची. अगदी दूधवालासुद्धा हिंदी असूनही त्याच्याशी ती मराठीतच बोलायची आणि तोही तिला "आई" अशीच हाक मारायचा. आणि ताबडतोब ती प्रत्युत्तरादाखल "श्रीराम जयराम" म्हणायची.

काही वर्षांपूर्वी आईला वॉकर घेऊन चालण्याची वेळ आली तेव्हा तिचे रामनाम अधिकच वाढले. उदा. उठताना, बसताना, चालताना, चहा पिताना "रामा, ऊठ. रामा, बैस. रामा, चाल. रामा, चहा घे.” . चालताना झोक जात असेल तर लगेच "रामा, पाडू नको रे! नीट चाल.” असं म्हणायची. जणु राम तिच्या समोरच उभा आहे! दिवसातून दहादा रामाला "थॅंक यू"सुद्धा म्हणायची. तिची मी नेहमी थट्टा करायचे की "अगं आई, राम तुझा मुलगा की गडी? त्याला सारखं वेठीला काय धरतेस?” तेव्हा ती म्हणायची, “आहेच माझा राम माझ्याबरोबर.”

अशी आमची रामभक्त आई, तिच्या रामाकडे गेली आणि आमच्या जीवनात मात्र मायेची पोकळी ठेवून गेली. आज रामाचं नाव घेताना डोळ्यासमोर राम न दिसता ते नाव घेणारी आईच दिसते व जाणवतं की आपण पोरके झालो.
Page copy protected against web site content infringement by Copyscape