Tuesday, March 27, 2007

श्रीरामाचा विजय

ऐकताचि वार्ता प्रभुविजयाची
सिद्ध स्वागतासी अयोध्यानिवासी होती

करूनी सडासंमार्जन रंगावली रेखिती
गुढ्या तोरणांनी नगरी श्रुंगारिती

होता प्रभु आगमन वाजे सनई मंजुळ
पुष्पांचा वर्षाव प्रभुंवर करीती

आला आला रामराया लक्ष्मण सीतेसह
भक्तिभावे जन दृष्ट त्यांची काढिती


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

ऋतुचक्र

आला वसंत ऋतु आला
पानझडीचा काळ संपला
फुटे पालवी नव वृक्षावर
येई मोहोर आम्रतरूवर

ग्रीष्माची लागता चाहुल
तप्त होतसे सकल धरातल
ऋतु हा आम्रफलांचा
अन् शीतल पेयांचा

वर्षाऋतुच्या आगमनाने
सृष्टी मोहरे आनंदाने
पर्जन्याने येई गारवा
ऋतु हा सणांचा अन् उत्साहाचा

शरदऋतु हा मुख्य सणांचा
दसरा, कोजागिरी, दिवाळीचा
शरदाचे चांदणे शीतल
करी भाव मनांतिल तरल

आली हेमंताची स्वारी
देई थंडीची ललकारी
येता थंडीची लाट
धुके पसरे ग दाट

करी आगमन शिशिर
वाहे जोराने समीर
ऋतु हा पानझाडीचा
ऋतुचक्रातील ऋतु शेवटचा


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Saturday, March 24, 2007

तृप्त जाहली वसुंधरा

ग्रीष्माच्या रणरणीत उन्हाने
तप्त जाहली वसुंधरा
अंगावरती ऊष्णतेने
पडल्या असंख्य चिरा

आभाळाचे मन द्रवले
पाहुन वसुंधरेला
अंबरी हे मेघ दाटले
समीर ललकारीत आला

सोसाट्याचा सुटला वारा
झरती पर्जन्याच्या धारा
प्राशन करुनी अमृतधारा
तृप्त जाहली वसुंधरा

-सौ. प्रतिमा उदय मनोहर

कोपरा

कोपरा मी मनाचा
असे भुकेला प्रेमाचा
मी साठवितो आठवणी
जीवनाच्या अगणित मनी

मी जोडी चार भिंतींना
चार ठिकाणी काटकोनात
देतसे आकृतीबंध तयांना
खोलीच्या बांधकामात

दिवाणखान्याचे आम्ही चार कोपरे
असतात आमचे विविध चेहरे
प्रत्येकाचे सजणे निराळे
प्रत्येकाच्या नशिबी काय? न कळे

कोपरा मी सरकारी इमारतीच्या जिन्याचा
करिती वापर माणसे विचित्रची माझा
कुणी टाकिती पानाची पिचकारी मम अंगावर
कुणी केरकचरा टाकिती वरचे वर

कोपरा मी रस्त्यावरील वळणाचा
असे थांबा मी रिक्षा थांबण्याचा
साक्षी मी रस्त्यावरील रहदारीचा
मित्र असे मी कॉलेज कुमारांचा


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Wednesday, March 21, 2007

मानसपूजा

करिते मी मानसपूजा
विघ्नहर्त्या मोरयाची.
यावे यावे गजानना
आज माझ्या सदनासी.

जरा थांब तू दारात
पद तव प्रक्षाळिते.
पुसुनिया तयांवरी
कुंकुम स्वस्तिक रेखिते.

लावुनिया निरांजन
औक्षण तुझे करिते
हाती साखर देऊनी
तुझे स्वागत करिते.

बसावे चौरंगावरी
पाद्यपूजा मी करीते.
केशर तिलक भाळी लावुनी
गळा पुष्पहार घालते.

अंगावरी अलंकार
माथा मुकुट शोभतो.
पितांबर नेसवूनी
यज्ञोपवीत मी अर्पिते.

आरती तुझी करोनी
मंत्रपुष्प मी वाहते.
शमी दूर्वा मांदार अन्
जास्वंद पदी वाहते.

नैवेद्य हा मोदकांचा
तसाच पेढे-बर्फीचा
अर्पुनिया तुज देवा
प्रर्थना तुझी करिते.

देवा राहो तुझे नाम
मुखी माझ्या अखंडित.
सेवा करण्याची बुद्धी
ठेवी जागृत निरंतर.

ही माझी मानसपूजा
स्वीकारावी हे गणेशा.
कृपाकर शिरी असावा
हेचि मागणे परमेशा.


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Monday, March 19, 2007

सागरांस

सागरा, तुझी निळाई मोहवी मनाला
तुझी अथांग व्याप्ती न कळे कधी मनाला

दडवले तुझिया पोटी अनमोल रत्नभंडार
शंख शिंपले मोती अन् विविध जलचर

तुझे रौद्र रूप भिवविते मनाला
गहिरे तुझे पाणी ओढ लावी जीवाला

वाटे व्हावे स्वार तुझिया लाटांवरी
तुझे अनुपम सौंदर्य अनुभवावे एकदा तरी


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

बाळ जातो दूर देशा

बाळ जातो दूर देशा, मनी वाटे हुरहुर
मन मायेचे हे वेडे, येती असंख्य विचार

नवा देश नवी भाषा, तेथे सारेच नवे रे
बाळा खंबीर मनाने, सूर तुझे जमवुनि घे रे

करी ज्ञान संपादन, लक्ष ठेवी ध्येयावरी
करी अभ्यास तू खूप, मिळवी यश तू अमाप

आशिर्वाद मातपित्यांचे बंधूचे, आहेत सदैव तुझे शिरी
शुभचिंतन करिती सारी, सान थोर सगी सोयरी

ध्येयपूर्ती झाल्यावरी आहे एकचि सांगणं
येई परतुनी घरी, फेडी मातृभूमीचे ऋण


-सौ. प्रतिमा उदय मनोहर