Sunday, November 10, 2013

इंद्रधनुष्य

तांबड्या लाल फ़ुलांनी करुया पूजन गणेशाचे
नारंगी झेंडुचे तोरण बांधुन सजवु देवघरा
पित फ़ुलांची वाहु ओंजळ प्रतिक असे जे तेजाचे
हिरवे वस्त्र लेवुनी वसुधा स्वागत करी सर्वांचे
निळ्या निरभ्र आकाशी धनु दिसे मनोरम इंद्राचे
पारवा हा रंग अनोखा शोभे इंद्र धनुष्यात
जांभळ्याची गडद किनार उठुन दिसते सर्वात
सप्त रंगी या धनुने शोभा वाढविली या गगनात
पाहुनी हरखे मयुर मनी नर्तन करी आनंदात

Tuesday, September 17, 2013

का गमलास दमुनी?

का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तूच प्रामाणिक असा साक्षीदार. माणसाच्या प्रगतीचा, बुद्धीचा कुठलाही आविष्कार तुझ्याशिवाय अपूर्णच! रामायण महाभारतासारखी महाकाव्ये असोत की गीता, ज्ञानेश्वरीसारखे धर्मग्रंथ. अगदी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात, गावात वाचले जाणारे साहित्य असो, वर्तमानपत्र असो, किंवा कुठलाही दस्तावेज असो, तुझ्याशिवाय सारे अशक्याच!

छापखाने खूप नंतर आले. तुझा उपयोग मात्र मानवाने अगदी आदिकालापासून केला. भूर्जपत्रापासून ते आजच्या सुंदर गुळगुळीत कागदापर्यंतचा तुझा प्रवास यात कितीतरी जीवनांचे, घटनांचे, आलेख तू सामावून घेतलेस. माणसाने त्याचा मानसन्मान, प्रतिष्ठा, मनातला राग, लोभ, गीत-काव्यासारख्या तरल भावना, इ. सर्व सर्व तुझ्या रूपात जतन करून ठेवले.

पण आज हाच मानव तुझा उपयोग लिहिण्याकरता कमी, व इतर कामांसाठी जास्त करायला लागलाय. चूल पेटवायचीये, कचरा जाळायचाय – पेटवा कागद, करा जाळ! माणूस आपल्या सर्वांगीण स्वच्छतेकरता तुझा वापर यथेच्छ करत आला आहे. तरीही बोलताना अगदी तुच्छतेने म्हणतो - किती घाण झाली आहे! उचला कागदाने आणि फेका बाहेर.

तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! लहानपणी शाळेत हस्तकलेचा तास असायचा त्यात कातरकामासाठी, फुले, हार, विविध वस्तू बनवण्यासाठी तुझा उपयोग करायला शिकवायचे! रंगीत, घोटीव, अशी तुझी वेगवेगळी रूपं पहायला मिळायची. तुझ्या या रूपांत तुला माणसाच्या निरागस बाल्याचा स्पर्श झाला आणि त्या हळुवार भावनेने भारावून जाऊन तू आयुष्यभर त्याचे मानसन्मान, त्याची सुखदुःखे, वैचारिक तगमग – सारं काही जपून ठेवलंस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विचार तू सर्वांना सारखेपणाने वागणूक देऊन स्वतःच्या शरीरावर सामावलेस व अमर केलेस.

छापण्याच्या तांत्रिक प्रगतीबरोबर तुझ्या रूपात अनेक बदल घडत गेले. आता तर किराणामाल, मिठाई, भाजीपाला, सर्वांसाठीच तुझ्या पिशव्यांचा वापर होतो. मध्यंतरी तुला शह देण्यासाठी पॉलिथिन हे टिकाऊ माध्यम आले. पण तुझी जागा मात्र त्याच्याही वरच राहिली. कारण तुला जाळले तरच मरण! अन्यथा, पुनर्वापराच्या तंत्रामुळे तुझा वापर अबाधित राहिला.

तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राची मदत घेतली जाते. पण तू असा गमू नकोस. दमला असशील, तरी रागावू नको रे!

Sunday, May 12, 2013

आई


आई म्हणजे आभाळ मायेचे, निस्वार्थ प्रेमाचे.

आज आईची खूप आठवण येते आहे. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत आईचे प्रेमळ छत्र लाभले हे खरेच माझे भाग्य. आईला जाऊन दोन महिने झालेत, पण अजूनही तिचे नसणे मन मान्यच करत नाही. ती होती तेव्हा अधुनमधुन आमचे फोनवर बोलणे व्हायचे. पण आता.... नुसत्या आठवणी.

बालपणीची आठवण म्हणजे आम्ही पुण्याला होतो, आम्ही सर्व भावंडे लहान होतो आणि घरी आजी होती. आई तेव्हा रेस्कॉन कंपनीत नोकरी करायची. सकाळी आपले काम भरभर आटपून पावणेआठवाजता घराबाहेर पडायची आणि साडेचार वाजता घरी यायची. तिची ती धावपळ, लगबग एवढीच तेव्हाची आठवण.

मध्ये बरीच वर्षे गेली. आम्ही आप्पांच्या (वडील) बदलीमुळे इंदौरला आलो. सुरुवातीची दोन वर्षे आई घरी होती. नंतर तिला एम्.पी..बी.मध्ये नोकरी लागली व परत तिची धावपळ सुरू झाली. कौतुकाची गोष्ट अशी, की वयाच्या चाळिशीत ती अप्पांकडून सायकल शिकली व ऑफ़िसला सायकलने जायला लागली.

आईला वाचनाची खूप आवड होती. ती दररोज रात्री आजीला शिवलीलामृत वाचून दाखवायची. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक तिला आवडलं की आजीला आवर्जून वाचून दाखवायची. दिवसभर नोकरी, सकाळ-संध्याकाळ घरकाम, यात व्यस्त असूनही आई प्रसन्न आणि मदत करायला सदैव तत्पर होती.

हातात कधी जपमाळ घेतली नाही, पण आईच्या तोंडात नेहमी रामनाम असे. कोणीही भेटलं की त्याला "श्रीराम जयराम" म्हणायची. हिंदीप्रदेशातच जन्मापासून राहिली, तरी सर्वांशी मराठीतच बोलायची. अगदी दूधवालासुद्धा हिंदी असूनही त्याच्याशी ती मराठीतच बोलायची आणि तोही तिला "आई" अशीच हाक मारायचा. आणि ताबडतोब ती प्रत्युत्तरादाखल "श्रीराम जयराम" म्हणायची.

काही वर्षांपूर्वी आईला वॉकर घेऊन चालण्याची वेळ आली तेव्हा तिचे रामनाम अधिकच वाढले. उदा. उठताना, बसताना, चालताना, चहा पिताना "रामा, ऊठ. रामा, बैस. रामा, चाल. रामा, चहा घे.” . चालताना झोक जात असेल तर लगेच "रामा, पाडू नको रे! नीट चाल.” असं म्हणायची. जणु राम तिच्या समोरच उभा आहे! दिवसातून दहादा रामाला "थॅंक यू"सुद्धा म्हणायची. तिची मी नेहमी थट्टा करायचे की "अगं आई, राम तुझा मुलगा की गडी? त्याला सारखं वेठीला काय धरतेस?” तेव्हा ती म्हणायची, “आहेच माझा राम माझ्याबरोबर.”

अशी आमची रामभक्त आई, तिच्या रामाकडे गेली आणि आमच्या जीवनात मात्र मायेची पोकळी ठेवून गेली. आज रामाचं नाव घेताना डोळ्यासमोर राम न दिसता ते नाव घेणारी आईच दिसते व जाणवतं की आपण पोरके झालो.

Wednesday, July 13, 2011

अक्का

अक्का मनोहर म्हणजे माझ्या सासूबाई. पण लग्न होऊन या घरात आले आणि या घरची लेकच झाले. मनातले सर्व रुसवे, तक्रारी मुलीच्या हक्काने अक्कांजवळ मी कराव्या आणि त्यांनीही आईच्या मायेने माझं मन समजून घ्यावं असं कित्येकदा घडलंय. अक्का एक साधी कुटुंबवत्सल स्त्री. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि प्रसन्न हास्य पाहून परका, अपरिचितसुद्धा त्यांचा जवळचा व्हायचा.

सकाळपासून रात्रीपर्यंत कुणीही कधीही घरी यावं, अक्कांनी नेहमीच त्याचं हसतमुखाने स्वागत केलंय हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. अत्यंत निरपेक्ष व सहज सर्वांवर प्रेम करणे हा त्यांचा स्वभाव. म्हणून त्या रागावल्या तरी त्यांचा राग फार काळ टिकत नसे. माझे सासरे पूर्वीच्या काळाप्रमाणे स्वभावाने गंभीर. ते फारसे कधी कुणाला रागवत नसत. पण त्यांचा न बोलताच धाक वाटत असे. मुलांना, सुनांना आणि नातवंडांनाही अक्का सांभाळून घेत.

एक त्यांचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे अक्का कधीही एकाची तक्रार दुसर्‍याजवळ करत नसत. चारही सुनांना त्यांनी आपल्यापरीने प्रेम दिलं. नातवंडांना तर आजी म्हणजे त्यांची मैत्रीणच वाटायची. आजीबरोबर पत्ते खेळणे, मस्ती करणे, तिला गोष्टी सांगायला लावणे.... आजीजवळ दुपारी कोण झोपणार यात एकमेकांशी भांडणे चालायची.

अक्कांचं शिक्षण फारसं नव्हतं. पण तरीही रोजचे वर्तमानपत्र त्या वाचायच्या आणि अनेक इंग्लिश शब्द त्यांच्या शब्दकोषात सहजपणे नांदत. कॅरम खेळायलाही त्यांना आवडत असे. टी.व्ही. आल्यानंतर क्रिकेटची मॅच त्या आवडीने पहायच्या. गाण्यांचीही त्यांना आवड होती. अगदी लहानात लहान मुलाने गाणं म्हटलं तरी त्या मान डोलवून दाद देत असतं. त्या स्वतः प्रसंगानुरूप काव्य करीत. त्यांनी नातवंडांसाठी पाळणे लिहिलेत.

वयाच्या अगदी ऐंशी वर्षातही हरतालिकेच्या दिवशी निर्जला उपवास त्या करत. मंगळागौरीच्या, हरतालिकेच्या जागरणात तर त्या विविध खेळही खेळत. त्या कधीही "मी थकले" म्हणत नसत. सदैव प्रसन्नता हे जणू त्यांना ईश्वराने दिलेलं वरदानच होते.

आज अक्कांना जाऊन चौदा वर्षे झाली तरीही घरात कुठे काही चांगले घडले की त्यांची पटकन आठवण येते आणि टचकन डोळ्यांत पाणी येतं. आज त्यांच्या नातवंडांची प्रगती पाहिली की वाटतं, की हे सर्व पहायला आज अक्का खरंच हव्या होत्या.

Monday, October 4, 2010

प्रवास

जीव वाढे मातेच्या उदरी
इच्छा सारे मातेच्या पुरविती
करिती कौतुक तिचे अपार
जीव वाढे दिसामासी भरभर

जीव येई जन्मास, आक्रंदे तो क्षणिक
आप्त सारे आनंदती, सोडती सुटकेचा श्वास
जीव आणि माता, सोसती प्रसवाचे त्रास
चाले शोभायात्रा जीवाची, सुरू होई प्रवास

बाल्य तारुण्य मध्यान वृद्धत्व
चारी अवस्थांतुनी चाले प्रवास
जीव चाले जीवनाची वाट
मिळे विविध संगत प्रवासात

बालपणी खेळगडी, तारुण्यात मित्रमैत्रिणी
माध्यानी प्रपंचातील नाती, देती त्यास साथ
आला वृद्धापकाळ, भिवविती सांजसावल्या मनास
लागे अनामिक हुरहूर मनास, कधी संपेल हा प्रवास?

Wednesday, December 31, 2008

रम्य सकाळ

उगवला रविकर हा गगनी
उजळली सर्वांगी अवनी

आला आला खट्याळ वारा
सुगंधित करी परिसर सारा

कुणी शुभांगी गुणगुणत मनी
सडा घालते पहा अंगणी

रेखुनी सुंदर रंगावली
रंग भरुनी तिला सजवली

या अशा प्रसन्न वेळी
पाऊले हरीची दारी थबकली

Sunday, October 5, 2008

एक प्रसन्न सकाळ

अहाहा! काय मस्त पाऊस पडतोय बाहेर!
आज रविवार कशाची घाई नाही. बाहेर रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरुच आहे. सकाळी उठल्यावर पहिला विचार मनात आला की आजची सुट्टी मस्त खावुन-पिवुन पावसाचा आनंद घेत उपभोगायची. लगेच आज काय काय करायचे याचे विचार मनात सुरु झाले. मन तर असं चंचल नं, की एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे विचर सुचु लागतात.
मग मनाला म्हटलं, "जरा गप्प बस की! मला ठरवू दे कहीतरी. आधी मस्त कॉफी कर."
मोठा कप भरुन कॉफी करुन घेतली आणि बसले गॅलरीत पावसाची मजा घेत, पावसाचं क्षणोक्षणी बदलणारं रूप पाहत. झाडांवरुन, पानांवरुन थेंब सरसर खाली येत होते, जणु मोत्यांची माळच कुणी ओवत आहे! झाडाची पानं अगदी स्वच्छ अंघोळ केल्यासारखी पावसाने सुस्नात झाली होती. एक वेगळंच हिरव्या रंगाचं तेज पहायला मिळालं.
कॉफी संपली.
चला आता काहीतरी खायला करु असा विचार केला अन चटकन पोहे करावे म्हणजे जास्त वेळ न जाता मनमुराद आराम करता येईल. परत अस्मादिक पोह्याची बशी हातात घेऊन गॅलरीत स्थानापन्न.
खरंच. अशी सुट्टी फारच क्वचित उपभोगायला मिळते नाही? पावसाचा आनंद घरबसल्या मिळाला नं की त्यातला मज़ा काही औरच! ह्यावर्षी सारखं मनात येत होतं, की कुठेतरी पावसाळी सहलीला जावं. पण मध्यंतरी पावसानी इतकी दडी मारली की वाटलं, परत उन्हाळाच सुरु झाला की काय?
पण ह्या निसर्गराजाला आली दया आणि झाली सुरु पुन्हा मेघांची बरसात. पोहे खाता खाता मन तर कोकणात फिरुनही आलं.
मनाचं आपलं बरं असतं. त्याला फिरायला पैसा, वेळ, वगैरे कहीच लागत नाही. क्षणात ते घरात असतं तर दुसयाच क्षणी कुठे फिरुन येईल ते सांगता येत नाही.
असो.
आपल्याला देवाने मन दिलंय म्हणुन तर आपण आनंदाची अनुभुती घेऊ शकतोय!
अरेच्च्या! पहा. मन बेट परत गंभीरतेकडे वळायला लागलंय. त्याला जरा ताकीद देते आणि येतेच हं परत तुमच्याशी गप्पा मारायला.

Saturday, July 26, 2008

मनाचिये गुंती

मन हे देवाने मानवाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. या मनाचा संचार सर्वत्र पूर्ण आयुष्यभर चालत असतो. अनिर्बंध, अनिवार, अमाप विचारांचे प्रवाह या मनात प्रवाहित होत असतात. सुखदुःख, चीड, द्वेष, आनंद, अशा अगणित भावनांचे भांडार या मनात दडलेले असते. मनाचा वेग तर प्रकाशाच्या वेगाहूनही अधिक असतो.

आपल्या कामात मनाचा सहभाग असेल तर ते काम जास्त चांगल्या रीतीने पार पडतं. मनाचा निश्चय झाला, तर कुठलेही अवघड काम करताना भीती वाटन नाही. जर मनाला आज्ञा दिली, की मला लवकर उठायचं आहे, तर मन आपल्याला ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं आगोदर उठवतं. आपणच आळसाने लोळत पडतो.

रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं शरीर मेंदूची आज्ञा बिनबोभाट पाळत असतं. रोजची कामं सवयीने आपण करतो. पण ज्या कामात आपलं मन रमतं, ते काम आपल्याला आनंद देतं. संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि कलांचा आस्वाद पूर्णपणे घ्यायचा असेल, तर मनाचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. मनाचा सहभाग सारखा खंडित होत असतो. अस्थिरता तर मनाला मिळालेला शापच आहे जणु. सतत विचारांची मालिका आपल्या मनाच्या पडद्यावर चालू असते. इतक्या कार्यक्षम मनाला एकाग्र करणं फारच कठीण काम आहे.

योग, प्राणायामाच्या सहाय्याने ही एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न केला तर मनातल्या सर्व विकारांचा समतोल साधता येईल. मनातल्या नकारात्मक भावना, न्यूनगंड दूर होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक होईल. मनाचा समतोल राखणे शक्य होईल.

मन ही देवता, मन हा ईश्वर
मन से बडा न कोई

मन हेच ईश्वर आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहील त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.

Wednesday, April 9, 2008

स्वागत नववर्षाचे

आज गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा याच दिवशी ब्रह्म्देवाने सृष्टीची रचना केली.ब्रह्मदेवाच्या या कृतीचे स्वागत गुढी उभारुन करतात. ब्रह्मदेवाच्या कर्तृत्वाचे प्रतिक म्हणुन या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हण्तात. १४ वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले. त्यांच्या आगमनाच्या आनंदोत्सव गुढी उभारुन साजरा करतात.
या चैत्राचे आणखी एक महत्व म्हणजे हा वसंत ऋतुचा महिना. शिशिराची पानगळ संपून झाडांना, वृक्षांना नवी पालवी फ़ुटते. कोवळ्या पालवीतून निसर्गाची कोमलता आपल्याला वेगळाच आनंद देते आम्रतरुवर मोहोर फ़ुलतो. कोकीळ गोड स्वरात गात असतो.सर्वत्र आल्हाददायक वातावरण असतं.
वर्षप्रतिपदे पासून ९ दिवस जागोजागी रामजन्मोत्सव साजरा करतात. सर्वत्र मंगलमय,भक्तीमय वातावरण असतं.ऋतुबदलाचा हा काळ असल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणुन गुढीपाडव्याला कडुलिंबाची फ़ुलं,पानं,हिंग,गूळ,चिंच व मीठ यांची चटणी करुन सकाळी खातात.सहा रसांच सेवन केलं जात.
आपण सर्व नववर्षाचे स्वागत करुया. हे नविन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धिचे व आनंदाची प्रगतीचे जावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करु.

Thursday, March 27, 2008

स्वप्न

स्वप्न म्हणजे काय असतं?
नकळत
सारं दिसत
सुप्त
मनाचा
मुक्तपणे
विहार असतो

स्वप्न म्हणजे सुप्त मनाने
जागेपणी
केलेले अवलोकन
अनेक
अतर्क्य अनाकलनीय
घटनांचे दृश्यांचे चिंतन

स्वप्न असते झोपेत फ़ुलणारे
जाग
येताच विरणारे
आभासालाही
खरे मानणारे
मनाला
नेहमीच गुंगविणारे

स्वप्नांची ही मालिका
दृश्य
दाखविते मनात
जागृती
येताच ती
अदृश्य
होते क्षणात

Wednesday, January 16, 2008

निसर्ग आणि धरा

त्याचं अस्तित्वंच वेगळं. तो अत्यंत अनाकलनीय, सुंदर, मनस्वी. त्याचा वेग, आवेग - सर्वच उस्फूर्त आणि कोसळल्यासारखं. असा हा किमयागार आहे तरी कोण?..... सतत रूपं बदलणारा. क्षणोक्षणी आश्चर्यचकित करणारा. कधी ढगांचे ढोल वाजवीत तर कधी वीजांचा लखलखाट करीत कोसळणार्‍या पावसातून आवेशाने व्यक्त्त होणारा. कधी तप्त झळांनी सर्व प्राणीमात्रांना त्रस्त करणारा.

त्याची सर्वच रूपं कशी रसरसती! त्याचं शांत रूप खूपच लोभस, कोमल, मनाला आल्हाददायक वाटणारं, सौंदर्याने नटलेलं. म्हणून तर मानव नेहमी त्याच्या सानिध्यात जाण्यास उत्सुक असतो. त्याचं नटणं तरी किती विविधरंगी! फुलांचे, पानांचे किती वेगवेगळे आकार, रंग! एकाचं रूप दुसर्‍याहून निराळं. त्याचं शांत रूप जितकं सुखावणारं तितकंच त्याचं रौद्र रूप मनाला भयभीत करणारं. सागर, नद्या अतीवृष्टीने आपली मर्यादा सोडतात आणि पुराने गावंच्या गावं नष्ट होतात. तर कुठे अती उष्णतेने वणवा पसरतो.

अनिर्बंध असतो तो. त्याला मनस्वी स्वभावामुळे विविधप्रकारे व्यक्त होणं जमतं. सुंदर तर तो आहेच; तसाच गूढही आहे. आणि तू, त्याची सखी - त्याच्या मनस्वीपणाला पूर्ण सामर्थ्याने सहन करणारी. किती गं सहनशील तू? त्याचे वेग, आवेग सर्व किती लीलया झेलतेस तू! त्याने पर्जन्याच्या धारांतून बरसावं आणि तू शांतपणे अंतरीच्या गूढ गर्भी शक्य तेवढं जल शोषून साठवून ठेवावं. अगदीच अनावर झालं तरंच नकार देतेस. त्याने तप्त झळांनी भाजुन काढलं तरी तू सहन करतेस. तुझी सहनशीलतेची मर्यादा संपली तर मात्र तू ज्वालामुखीच्या रूपाने आपली असह्य उष्णता बाहेर टाकतेस. आणि परत त्याच्या अनावरतेला सामावून घेण्यास सिद्ध व सज्ज होतेस. त्याने केलेल्या जलसिंचनाने तृप्त होऊन हिरवाईचा शेला पांघरून परत त्यच्या स्वागतास प्रसन्नपणे सामोरी जातेस.

तुझ्याशिवाय त्याचं फुलणं अपुरं आहे आणि त्याच्या उत्कटतेशिवय तूही अपूर्णच आहेस की गं. जन्मोजन्मीचं अतूट नातं आहे तुमचं दोघांचं! मानवाला अन्न, वस्त्र, निवारा देतेस म्हणून तुला अवनि म्हणतात. सर्व सजीवांना आधार देते म्हणुन तुला धरा म्हणतात. सर्वांवर मातेसारखे प्रेम करतेस म्हणून तू वंदनीय आहेस, पूजनीय आहेस. हे धरणीमाते, हे निसर्गराजा, तुम्हाला शतश: प्रणाम!

Monday, December 17, 2007

आई

आई असते घराचे जागतेपण
तिच्या वावरण्याचे नसते दडपण
शांतपणे देते ती सर्वांना मनोबळ
तिलाच सांगु शकतो आपण मनातील खळबळ

ती असते समईतील वात
मनोभावे रमते ती प्रपंचात
तिचे असणे धरले जाते नेहमी गृहीत
पण नसणे मात्र जाणवते मनाला सदोदित

Saturday, December 1, 2007

स्त्री

स्त्री म्हणजे घराचे घरपण ही व्याख्या फार जुनी झाली. नुसत घरपण जपण हेच तिच कर्तव्य किंवा कर्तुत्व राहील नसून तिच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. पूर्वी तिच संपूर्ण जीवन नात्यांच्या बंधनात बांधलेल होत. जन्मत: ती मुलगी नंतर बहिण, पत्नी व नंतर मुलांची माता. या प्रत्येक नात्यात तिला अनेक बंधन आहेत पण तरीही ती सर्व बंधन स्वीकारुनही आजची स्त्री आपल्या हुशारीने, बुद्धीने व कार्याने आपले स्वतंत्र सन्माननीय स्थान जगात मिलावून दाखविते. स्त्री म्हणजे अनाकलनीय न उलगड्णार कोड आहे. ती भोळीभाबडी आहे तशीच चतूरही आहे. ती दवासारखी टवटवित हवेसारखी तरल आहे ती मनाने खंबीर आहे. तिच्यामुळेच घराच घरपण टिकतच पण त्याच बरोबार समाज टिकुन राहण्यास आवश्यक असलेले ऋणानुबंध ही तिच्याचमुळे द्रूढ होतात. एका नव्या जीवाला जन्म देण्याची क्षमता देवाने फक्त तिलाच बहाल केली आहे. ह्या नैसर्गिक देणगीने स्त्री ही जगातील सजीवात सर्वोच्च स्थानावर आहे म्हणूनच ती पूजनीय आहे. ती एका जिवालानूसता जन्म देत नाही तर त्याच पालनपोषण करून त्या जीवाला जगात माणुस म्हणुन जगण्यासाठी सक्षम करण्याचे मोठे कार्य ती सहजतेने करते स्त्रीच कार्यक्षेत्र आता विस्तारल आहे. मुलांच संगोपन, कुटुंबातील नातेसंबध जपणं वृध्दांची आजारी व्यक्तींची सेवा करणं,गरज असेल तर अर्थाजन करून पतील आर्थिक साथही ती देते हे सर्व करताना तिचं शारिरीक व आत्मिक दोन्ही बळ खर्च होत असतं पण ती हसतमुखाने सर्व आघाड्यांवर सतत काम करत असते.स्त्री भावनाप्रधान आहे म्हणुन बाळाला आई मिळते, सासुला चांगली सून मिळते पतीला चांगली सहचारिणी मिळते . समाजाच समृध्द रूप जगासमोर येत ती प्रत्येकच्या भावना जपण्याचा प्रयत्न करते वादविवाद,भांडण टाळण्याचा प्रयत्न करत असते तिच्या मनाचा समतोल चांगला साधला तर जिजाऊसारखी आदर्श माता जगासमोर येते तिच्या मनस्वीपणाचा अतिरेक झाला तर कैकेयीसारखी माता पहायला मिळते. क्षणात हसणारी, क्षणात रडणारी, थोड्या दु:खाने हळवी होणारी, कणखरपणे एखादा निर्णय घेणारी, अशी विविध रूप स्त्रीत दडलेली असतत. जगात सर्व काही माणूस मिळवू शकतो पण जन्मघेण्यसाथी एका स्त्रीची कुसच लागतेह्म्हणुनच स्त्रीला प्रथम वंदन करतात "मातृदेवोभव" स्त्री खरच एक अनाकलनीय व्यक्तीमत्व आहे

Saturday, November 17, 2007

नादब्रह्म

सप्त स्वर संगीताचे
भाव उकलती मनाचे
किमया या सात स्वरांची
निर्मिती होई नव रसांची

होता स्वरांचा झंकार
होई नादब्रह्म साकार
संगीताचे साकारणे
हे तो ईश्वराचे देणे

Friday, October 26, 2007

ब्लॉगचे हस्तांतरण

सप्रेम नमस्कार,

माझ्या आईच्या कवितांचा हा ब्लॉग दि. १९ मार्च २००७ मी रोजी सुरू केला. आईच्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा त्यामागील हेतू होता. आपल्यासारख्या रसिक वाचकांनी अधुन मधुन प्रतिक्रिया व्यक्त करून तो सफलही केला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मध्यंतरी आईची प्रोफाईल तयार केली व तिने स्वत: या ब्लॉगमध्ये दोन कविताही लिहिल्यात. आता आई भारतात व मी भारताबाहेर असल्यामुळे, तिच्या कविता तिने प्रकाशित करणं जास्त सोयीस्कर आहे. आज या ब्लॉगची सूत्रे आईच्या हातात देताना मला अत्यंत आनंद होतोय. आईच्या कविता आता तिच्याच हस्ते प्रकाशित होतील याचा आनंद शब्दातीत आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आईला मी अनेक शुभेच्छांसह हा ब्लॉग हस्तांतरित करीत आहे. या ब्लॉगवर असंच प्रेम करीत रहाल असा मला विश्वास आहे.
धन्यवाद.

-प्रशांत उदय मनोहर
Page copy protected against web site content infringement by Copyscape