अक्का मनोहर म्हणजे माझ्या सासूबाई. पण लग्न होऊन या घरात आले आणि या घरची लेकच झाले. मनातले सर्व रुसवे, तक्रारी मुलीच्या हक्काने अक्कांजवळ मी कराव्या आणि त्यांनीही आईच्या मायेने माझं मन समजून घ्यावं असं कित्येकदा घडलंय. अक्का एक साधी कुटुंबवत्सल स्त्री. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि प्रसन्न हास्य पाहून परका, अपरिचितसुद्धा त्यांचा जवळचा व्हायचा.
सकाळपासून रात्रीपर्यंत कुणीही कधीही घरी यावं, अक्कांनी नेहमीच त्याचं हसतमुखाने स्वागत केलंय हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. अत्यंत निरपेक्ष व सहज सर्वांवर प्रेम करणे हा त्यांचा स्वभाव. म्हणून त्या रागावल्या तरी त्यांचा राग फार काळ टिकत नसे. माझे सासरे पूर्वीच्या काळाप्रमाणे स्वभावाने गंभीर. ते फारसे कधी कुणाला रागवत नसत. पण त्यांचा न बोलताच धाक वाटत असे. मुलांना, सुनांना आणि नातवंडांनाही अक्का सांभाळून घेत.
एक त्यांचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे अक्का कधीही एकाची तक्रार दुसर्याजवळ करत नसत. चारही सुनांना त्यांनी आपल्यापरीने प्रेम दिलं. नातवंडांना तर आजी म्हणजे त्यांची मैत्रीणच वाटायची. आजीबरोबर पत्ते खेळणे, मस्ती करणे, तिला गोष्टी सांगायला लावणे.... आजीजवळ दुपारी कोण झोपणार यात एकमेकांशी भांडणे चालायची.
अक्कांचं शिक्षण फारसं नव्हतं. पण तरीही रोजचे वर्तमानपत्र त्या वाचायच्या आणि अनेक इंग्लिश शब्द त्यांच्या शब्दकोषात सहजपणे नांदत. कॅरम खेळायलाही त्यांना आवडत असे. टी.व्ही. आल्यानंतर क्रिकेटची मॅच त्या आवडीने पहायच्या. गाण्यांचीही त्यांना आवड होती. अगदी लहानात लहान मुलाने गाणं म्हटलं तरी त्या मान डोलवून दाद देत असतं. त्या स्वतः प्रसंगानुरूप काव्य करीत. त्यांनी नातवंडांसाठी पाळणे लिहिलेत.
वयाच्या अगदी ऐंशी वर्षातही हरतालिकेच्या दिवशी निर्जला उपवास त्या करत. मंगळागौरीच्या, हरतालिकेच्या जागरणात तर त्या विविध खेळही खेळत. त्या कधीही "मी थकले" म्हणत नसत. सदैव प्रसन्नता हे जणू त्यांना ईश्वराने दिलेलं वरदानच होते.
आज अक्कांना जाऊन चौदा वर्षे झाली तरीही घरात कुठे काही चांगले घडले की त्यांची पटकन आठवण येते आणि टचकन डोळ्यांत पाणी येतं. आज त्यांच्या नातवंडांची प्रगती पाहिली की वाटतं, की हे सर्व पहायला आज अक्का खरंच हव्या होत्या.
1 comment:
खूपच दिवसांनी ह्या ब्लॉग वर आले अन् अक्कांचं सुंदर व्यक्ति चित्र वाचायला मिळालं . लिहीत रहा प्रतिमा ताई.
Post a Comment