Wednesday, March 21, 2007

मानसपूजा

करिते मी मानसपूजा
विघ्नहर्त्या मोरयाची.
यावे यावे गजानना
आज माझ्या सदनासी.

जरा थांब तू दारात
पद तव प्रक्षाळिते.
पुसुनिया तयांवरी
कुंकुम स्वस्तिक रेखिते.

लावुनिया निरांजन
औक्षण तुझे करिते
हाती साखर देऊनी
तुझे स्वागत करिते.

बसावे चौरंगावरी
पाद्यपूजा मी करीते.
केशर तिलक भाळी लावुनी
गळा पुष्पहार घालते.

अंगावरी अलंकार
माथा मुकुट शोभतो.
पितांबर नेसवूनी
यज्ञोपवीत मी अर्पिते.

आरती तुझी करोनी
मंत्रपुष्प मी वाहते.
शमी दूर्वा मांदार अन्
जास्वंद पदी वाहते.

नैवेद्य हा मोदकांचा
तसाच पेढे-बर्फीचा
अर्पुनिया तुज देवा
प्रर्थना तुझी करिते.

देवा राहो तुझे नाम
मुखी माझ्या अखंडित.
सेवा करण्याची बुद्धी
ठेवी जागृत निरंतर.

ही माझी मानसपूजा
स्वीकारावी हे गणेशा.
कृपाकर शिरी असावा
हेचि मागणे परमेशा.


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

No comments:

Page copy protected against web site content infringement by Copyscape