का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तूच प्रामाणिक असा साक्षीदार. माणसाच्या प्रगतीचा, बुद्धीचा कुठलाही आविष्कार तुझ्याशिवाय अपूर्णच! रामायण महाभारतासारखी महाकाव्ये असोत की गीता, ज्ञानेश्वरीसारखे धर्मग्रंथ. अगदी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात, गावात वाचले जाणारे साहित्य असो, वर्तमानपत्र असो, किंवा कुठलाही दस्तावेज असो, तुझ्याशिवाय सारे अशक्याच!
छापखाने खूप नंतर आले. तुझा उपयोग मात्र मानवाने अगदी आदिकालापासून केला. भूर्जपत्रापासून ते आजच्या सुंदर गुळगुळीत कागदापर्यंतचा तुझा प्रवास यात कितीतरी जीवनांचे, घटनांचे, आलेख तू सामावून घेतलेस. माणसाने त्याचा मानसन्मान, प्रतिष्ठा, मनातला राग, लोभ, गीत-काव्यासारख्या तरल भावना, इ. सर्व सर्व तुझ्या रूपात जतन करून ठेवले.
पण आज हाच मानव तुझा उपयोग लिहिण्याकरता कमी, व इतर कामांसाठी जास्त करायला लागलाय. चूल पेटवायचीये, कचरा जाळायचाय – पेटवा कागद, करा जाळ! माणूस आपल्या सर्वांगीण स्वच्छतेकरता तुझा वापर यथेच्छ करत आला आहे. तरीही बोलताना अगदी तुच्छतेने म्हणतो - किती घाण झाली आहे! उचला कागदाने आणि फेका बाहेर.
तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! लहानपणी शाळेत हस्तकलेचा तास असायचा त्यात कातरकामासाठी, फुले, हार, विविध वस्तू बनवण्यासाठी तुझा उपयोग करायला शिकवायचे! रंगीत, घोटीव, अशी तुझी वेगवेगळी रूपं पहायला मिळायची. तुझ्या या रूपांत तुला माणसाच्या निरागस बाल्याचा स्पर्श झाला आणि त्या हळुवार भावनेने भारावून जाऊन तू आयुष्यभर त्याचे मानसन्मान, त्याची सुखदुःखे, वैचारिक तगमग – सारं काही जपून ठेवलंस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विचार तू सर्वांना सारखेपणाने वागणूक देऊन स्वतःच्या शरीरावर सामावलेस व अमर केलेस.
छापण्याच्या तांत्रिक प्रगतीबरोबर तुझ्या रूपात अनेक बदल घडत गेले. आता तर किराणामाल, मिठाई, भाजीपाला, सर्वांसाठीच तुझ्या पिशव्यांचा वापर होतो. मध्यंतरी तुला शह देण्यासाठी पॉलिथिन हे टिकाऊ माध्यम आले. पण तुझी जागा मात्र त्याच्याही वरच राहिली. कारण तुला जाळले तरच मरण! अन्यथा, पुनर्वापराच्या तंत्रामुळे तुझा वापर अबाधित राहिला.
तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राची मदत घेतली जाते. पण तू असा गमू नकोस. दमला असशील, तरी रागावू नको रे!